
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे
राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी “मोकाट कुत्री प्राणीमित्रांच्या घरी पाठवा” असे विधान केल्याने पशूप्रेमी आणि संतवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील जैन मुनी निलेशचंद्र यांनी या वादात उडी घेत लांडगे यांच्यावर टीका केली असून त्यांना थेट आवाहन केले आहे.
“तुमच्याकडे जितकी कुत्री आहेत, ती आमच्याकडे पाठवा” – जैन मुनी
जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले,
“महेश लांडगे हिंदूवादी नेते असूनही अशा प्रकारचे विधान करतात, हे योग्य नाही. त्यांनी त्यांच्या भागातील जितकी कुत्री आहेत ती आम्हाला पाठवावीत. आम्ही जैन समाजाकडून गाडी पाठवू. गायींसाठी जशी गोशाळा चालवतो, तशीच व्यवस्था कुत्र्यांसाठीही करू.”
“प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार”
जैन मुनी यांनी संविधानाचा दाखला देत प्राण्यांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला.
“प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. आज कबूतर, कुत्रे, हत्ती, उंदीर अशा सर्व मुक्या प्राण्यांच्या विरोधात भाषा वापरली जाते. हा प्रश्न फक्त प्राण्यांचा नाही, तर मानवी संवेदनांचा आहे,” असे ते म्हणाले.
राजकीय नेत्यांवर टीकास्त्र
मनीषा कायंदे व चित्रा वाघ यांनी काढलेल्या कबूतर विषयावरूनही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
तसेच,
“भाजपचे आमदार-खासदार प्राण्यांच्या मागे लागण्यापेक्षा बाबरी मशीद पुन्हा उभारण्याच्या हालचालींच्या मागे लागा. महाराष्ट्रात बाबरीचे अवलादी फिरत आहेत. त्यांना आवरा,” असे ते म्हणाले.
जैन मुनी यांनी इम्तियाज जलील, वारीस पठाण आणि अबू आजमी यांच्यावरही टीका करत, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर असे लोक कसे?” असा प्रश्न उपस्थित केला.
“देशविघातक प्रवृत्तींशी लढा, प्राण्यांशी नाही”
ते पुढे म्हणाले,
“बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार असताना एमआयएमचा एकही आमदार नव्हता. आता सर्वत्र त्यांचा विस्तार होतोय. आम्ही जैन समाज अहिंसेचे प्रतीक आहोत आणि पशुप्रेमाने जगतो. सनातन धर्म सांगतो – पहिली भाकरी गाईला, दुसरी कुत्र्यांना द्या. मग इतर प्राण्यांना. त्यामुळे महेश लांडगे यांनी प्राण्यांच्या मागे न लागता देशविघातक प्रवृत्तींचा सामना करावा.”
वादाला उधाण, दोन्ही बाजू ठाम
आमदार महेश लांडगे यांनी शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून आता संतसमाज आणि पशूप्रेमी यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
👉 अधिक अपडेट्ससाठी माणदेश एक्सप्रेस न्यूजसोबत राहा.


