
माणदेश एक्सप्रेस न्युज | नवी दिल्ली :
अमेरिका आणि भारतामधील वाढत्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारतानं तेल खरेदीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर अमेरिकेकडून प्रचंड दबाव टाकला जात असतानाही भारताने स्वतःचा ऊर्जासुरक्षा धोरण ठाम ठेवले आहे. याच दरम्यान भारताने आणखी एका महत्त्वाच्या देशाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा मार्ग खुला केला आहे. तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर अजरबैजानकडून भारतात पुन्हा एकदा कच्च्या तेलाची निर्यात सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका भारतावर रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्याचा दबाव टाकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एच-1 बी व्हिसावरील शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली. आता भारतीय आयटी क्षेत्राला या निर्णयाचा फटका बसणार असून, एच-1 बी व्हिसासाठी तब्बल 1 लाख डॉलर (सुमारे 88 लाख रुपये) आकारले जातील. हे बदल भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकतात. तरीदेखील भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली असून आता अजरबैजानकडूनही खरेदीला पुन्हा सुरुवात केली आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, अजरबैजानने ऑगस्ट 2024 मध्ये भारताला 1,747.07 टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. याची किंमत जवळपास 7,81,520 डॉलर इतकी आहे. दोन्ही देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरून झालेला वाद मिटल्यानंतर हा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
ऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार हे भारत-अजरबैजान संबंधांचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. 2024 मध्ये भारत हा अजरबैजानकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा चौथा सर्वात मोठा ग्राहक ठरला. या काळात भारताने 11.7 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली ज्याची किंमत 72.9 कोटी डॉलर इतकी होती.
तर 2022-2023 या कालावधीत भारत अजरबैजानकडून तेल खरेदी करणारा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्राहक होता. या काळात तब्बल 20 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी करण्यात आली ज्याची किंमत जवळपास 1.6 अब्ज डॉलर इतकी होती.
तेल खरेदीपुरतेच मर्यादित न राहता भारताने अजरबैजानमध्ये थेट गुंतवणूकही केली आहे. बाकूमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, भारताच्या ओएनजीसी व्हीएल (ONGC Videsh Limited) ने अजरबैजानमधील अजेरीज-चिराग-गुनाशाली तेल व गॅस प्रकल्पामध्ये तब्बल 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, भारताने तेल खरेदीसाठी अनेक पर्यायी मार्ग खुले ठेवणे हे ऊर्जासुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशिया, मध्य-पूर्वेतील देश, आणि आता पुन्हा अजरबैजानकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जासाठ्याचा तुटवडा भासणार नाही, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची खरेदीशक्तीही वाढणार आहे.
एकूणच, टॅरिफ वॉरच्या छायेतही भारताने घेतलेला हा निर्णय भविष्यातील ऊर्जा धोरणात महत्त्वपूर्ण ठरणार असून, अजरबैजानसोबतचे नवे अध्याय भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी उपयोगी पडणार आहेत.