
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी मुंबई :
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच सोमवारपासून सुरू झालेल्या पितृपंधरवड्यात भाजीपाल्याला मोठी मागणी असल्याने दर शंभरी गाठू लागले आहेत.
सामान्यतः एपीएमसी बाजारात दररोज 600 हून अधिक गाड्यांतून भाजीपाला येतो. मात्र सध्या फक्त 400 ते 450 गाड्यांचीच आवक होत आहे. एका बाजूला आवक कमी असताना दुसऱ्या बाजूला पितृपंधरवड्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, मागणी व पुरवठा यात विसंगती निर्माण झाली असून दर वाढले आहेत.
पावसामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात घाऊक दरापेक्षा दुप्पटीने अधिक भाव आकारले जात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात 40 ते 50 रुपयांत उपलब्ध होणाऱ्या भाज्या आता किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपयांत विकल्या जात आहेत.
पितृपंधरवड्यात विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर केला जातो. विशेषतः गवार, भोपळा, चवळी, भेंडी, तोंडली, शेवगा, घेवडा या भाज्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. ग्राहकांच्या मते, “पितृपक्षात पारंपरिक पदार्थ करण्यासाठी नाईलाजास्तव महाग भाज्याही विकत घ्याव्या लागत आहेत.”
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांतून एपीएमसीत वाटाण्याची आवक होते. मात्र पावसामुळे आवक कमी झाल्याने वाटाण्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. एपीएमसीत वाटाणा 60 ते 130 रुपये किलो या दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात हा दर आणखी जास्त असल्याचे दिसत आहे.
घाऊक दर (प्रति किलो)
काकडी: ₹14 ते ₹20
टोमॅटो: ₹16 ते ₹20
फरसबी: ₹50 ते ₹60
शेवगा: ₹30 ते ₹40
गाजर: ₹16 ते ₹18
वाटाणा: ₹60 ते ₹130
फ्लॉवर: ₹12 ते ₹14
वांगी: ₹20 ते ₹24
गवार: ₹60 ते ₹70
दुधी: ₹30 ते ₹40
पालक: ₹8 ते ₹10
मेथी: ₹7 ते ₹8
दर आणखी वाढणार?
व्यापाऱ्यांच्या मते, “आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाजीपाल्याचे दर काही दिवस तरी चढे राहण्याची शक्यता आहे.” त्यामुळे पुढील पंधरवडाभर ग्राहकांना महाग भाज्यांचा तगडा भडका बसण्याची चिन्हे आहेत.