शेततलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू ; मुलीला वाचविताना आईचाही दुर्दैवी अंत

0
141

माणदेश एक्सप्रेस न्यूज | जत :

जत तालुक्यातील बेळोंडगी (ता. जत) येथे बुधवारी (दि. 20 ऑगस्ट) दुपारी भीषण घटना घडली. केवळ दोन वर्षांची मुलगी शेततलावात पडली आणि तिला वाचविण्याच्या धडपडीत आईचाही जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये कावेरी आनंद संबर्गी (वय 20 वर्षे) व तिची लहान मुलगी लक्ष्मी आनंद संबर्गी (वय 2 वर्षे) यांचा समावेश आहे.


कसा घडला प्रकार?

बेळोंडगी येथे कावेरी संबर्गी यांच्या घराशेजारीच शेततलाव आहे. बुधवारी दुपारी लहान लक्ष्मी खेळता खेळता तलावाकडे गेली आणि त्यात पडली. मुलगी बुडताना पाहताच आई कावेरीने घाईघाईने तलावात उडी घेतली. मात्र तिला पोहता येत नसल्याने तीही पाण्यात खोलवर बुडाली. काही क्षणांतच माय-लेकीचा दुर्दैवी अंत झाला.


घटनास्थळी प्रशासन

घटनेची माहिती पोलीसपाटील वैशाली पुजारी यांनी उमदी पोलिसांना दिली. तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक दिनेश दसाडे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या प्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून उपनिरीक्षक दिनेश दसाडे यांचा तपास सुरू आहे.


गावात हळहळ

या घटनेमुळे बेळोंडगी परिसरात शोककळा पसरली आहे. फक्त दोन वर्षांच्या चिमुरडीला वाचविण्यासाठी आईनेही प्राण पणाला लावले, मात्र दोघींनाही जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here