
माणदेश एक्सप्रेस न्युज | बीड :
बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याची मोठी घोषणा केली. दशकानुदशके प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे बीडकरांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न आता साकार होणार असून, जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बीड हा मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा असूनही, रेल्वे जाळ्यापासून तो वंचित राहिला होता. उद्योगधंदे, रोजगाराच्या संधी, मालवाहतूक यासाठी जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक रेल्वेसेवेची मागणी करीत होते. या पार्श्वभूमीवर ‘रेल्वे प्रकल्पाला मंजुरी’ ही घोषणा बीडकरांसाठी दिलासा ठरली आहे.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे.
बीडमधील रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची सोय सुधारेल, औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
छत्रपती संभाजीनगरमधील वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक विकासाचा उल्लेख करत त्यांनी बीडचाही यात समावेश होईल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली.
शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल, याची हमी त्यांनी दिली.
दुष्काळ निर्मूलनासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
“मराठवाडा आणि बीडच्या शेतकऱ्यांना सरकार संकटात एकटे सोडणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या घोषणेमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ही घोषणा स्वागतार्ह ठरवली आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे थेट नाते राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांशी जोडले जाणार असून, यामुळे आर्थिक उन्नतीची दारे खुली होतील.