शेतकऱ्याला न्याय हवा होता, पण पोलिसांनी दिली धमकी! बीडमध्ये धक्कादायक प्रकार

0
287

माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला अजूनही ओहोटी लागलेली नाही. पवनचक्की कंपनीच्या वादातून झालेल्या देशमुख हत्येने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी वर्ग हादरला होता. या घटनेनंतरही बीड जिल्ह्यात गुंडगिरी, दडपशाही, आणि सत्तेचा गैरवापर अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता याच मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे — पोलिसानेच एका शेतकऱ्याला “कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या!” अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कानडी घाट येथील दोन शेतकरी — गणेश झोडगे आणि कृष्णा कुडके — यांच्या शेतातून O2 Renewable या पवनचक्की कंपनीचे वीजपुरवठा करणारे टॉवर आणि तारांचे काम सुरु आहे. कंपनीने शेतकऱ्यांना मावेजा (भरपाई) न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आणि काम थांबवले.

दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी काम रोखल्यावर, नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच वाद वाढला आणि पोलीस कर्मचारी दत्ता बळवंत यांनी शेतकरी गणेश झोडगे यांना थेट धमकी दिली

तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन बेट्या!

या धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, बीड जिल्ह्यात या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.


या घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पोलिसाचा आक्रमक सूर स्पष्टपणे ऐकू येतो. या प्रकरणानंतर स्थानिक शेतकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कायद्याचे रक्षकच जर धमकी देत असतील, तर शेतकऱ्यांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.


दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचारी दत्ता बळवंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले –

“तो व्हिडिओ आमचाच आहे. शेतकरी टॉवरचे नट-बोल्ट काढत होते. आम्ही त्यांना कायदेशीर मार्गाने मावेजा मिळवा, अशी सूचना करत होतो. मात्र त्यांनी ऐकले नाही, त्यामुळे परिस्थिती ताणली गेली.”

त्यांच्या या स्पष्टीकरणावर मात्र शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे.


शेतकरी गणेश झोडगे यांनी सांगितले,

“आमचं शेत गेलं, वीज टॉवर आमच्या जमिनीवर उभा केला. कंपनीने मावेजा दिला नाही, म्हणून काम थांबवलं. आम्हाला पोलिसांनीच धमकी दिली. आमचं काय चुकलं?”

शेतकरी संघटनांनी या प्रकरणाचा सखोल तपास आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पांभोवती गुंतलेले आर्थिक व्यवहार, राजकीय दबाव आणि गुंडगिरी पुन्हा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना धमकावणे, जमिनीवर दडपशाही करणे, आणि पोलिसांकडून अन्यायकारक वागणूक मिळणे या घटना वाढत आहेत.

शेतकऱ्याच्या जमिनीवर टॉवर उभारायचा, मावेजा द्यायचा नाही आणि वर धमकी द्यायची? हा न्याय आहे का?” — असा संतप्त प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.


या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. व्हिडिओमध्ये पोलिसाचे वर्तन स्पष्ट दिसत असून, उच्चस्तरीय चौकशी आणि कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, नेकनूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here