बीडच्या माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट : हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा धक्कादायक दावा

0
253

माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 38) यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे समजले होते. मात्र, आता त्यांच्या नातेवाईकांनी “गोविंद आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे,” असा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागले आहे.


शुक्रवारी रात्री उशिरा गोविंद बर्गे यांनी आपल्या चारचाकी गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी धावले. मात्र, तिथे गाडीची बॅटरी पूर्ण उतरलेली असल्याने त्यांना संशय आला.

नातेवाईकांचे म्हणणे आहे की, “गोविंदने आयुष्यात कधीही हातात साधी काठीदेखील ठेवली नाही, मग त्याच्याकडे बंदूक कुठून आली? त्याच्याकडे स्वतःची बंदूक नव्हती. मग अचानक ही बंदूक कुठून आली? त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येचे नसून थेट खूनाचे आहे,” असा ठाम दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.


या प्रकरणात पोलिसांनी कला केंद्रात डान्स करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद आणि पूजामध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात गोविंदने तिला महागडे सोन्याचे दागिने व मोठी रक्कम दिल्याचे समोर आले आहे. याशिवाय, गेवराईतील एक बंगला आपल्या नावावर करून द्यावा यासाठी पूजा सतत दबाव टाकत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.


गोविंद आत्महत्या करू शकत नाही, त्याला अडकवून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना देखील या दाव्यामुळे तपासाची दिशा बदलावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


या प्रकरणात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकच गतीमान करण्यात आला आहे. गोविंदच्या मृत्यूमागील खरे कारण नेमके काय, हे समोर येण्यासाठी पोलिस विविध कोनातून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी तसेच नर्तकी पूजाची चौकशी यावरून या प्रकरणाला अंतिम दिशा मिळणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here