गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण; प्रेमातून संपला तरुण नेता, नर्तकीवर गुन्हा

0
284

माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोविंद आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतानाच संबंधित नर्तकी पूजा गायकवाड सोशल मीडियावर डान्सचा व्हिडीओ अपलोड करत होती. या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


गोविंद बर्गे हे राजकारणासोबतच व्यवसायात देखील सक्रिय होते. मागील काही वर्षांपासून त्यांनी प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवत त्यांनी गेवराईत टोलेजंग बंगला उभारला, जमीन खरेदी केली तसेच चारचाकी गाड्यांसह ऐषआरामी जीवन जगू लागले.


दरम्यान, त्यांची ओळख कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू ही ओळख जवळिकीपर्यंत पोहोचली आणि गोविंद पूजाच्या प्रेमात पडले. ते रोजच कला केंद्रात जाऊ लागले. दीड वर्षाच्या कालावधीत गोविंदने पूजाला महागडे दागिने, आयफोन अशी अनेक भेटवस्तू दिल्या.


मात्र, पूजाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत गेल्या. तिला गोविंदचा गेवराईतील बंगला व काही जमीन हवी होती. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पूजाने गोविंदशी संवाद साधणे बंद केले. त्यामुळे गोविंद प्रचंड तणावाखाली गेला. तो पूजाशी संपर्क साधण्यासाठी, तिला भेटण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. पण पूजा मात्र सोशल मीडियावर डान्स करून व्हिडीओ अपलोड करण्यात व्यस्त होती.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद हा पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासरच्या गावी तिची भेट घेण्यासाठी गेला होता. मात्र, तिथेही संवाद झाला नाही. मानसिक तणाव वाढत असताना गोविंदने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याच दरम्यान पूजा गायकवाड हिने ‘उससे नजर मिली बीच बाजार में’ या गाण्यावर डान्सचा व्हिडीओ चक्क इंस्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून नागरिकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.


या घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून नर्तकी पूजा गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात व तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.


माजी उपसरपंचासारखा समाजात आपली ओळख निर्माण केलेल्या तरुण नेत्याने टोकाचे पाऊल उचलल्याने लुखामसला परिसरात मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले असून, सोशल मीडियावरही या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here