
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्यातील काटवटवाडी गावात घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हळहळून टाकणारी ठरली आहे. केवळ 7 महिन्यांच्या निरागस बालिकेचा घशात चॉकलेट अडकल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातच नव्हे तर जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत बालिकेचे नाव आरोही आनंद खोड असे असून ती नुकतीच 7 महिन्यांची झाली होती. सोमवारी घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले चॉकलेट तिने हातात घेतले आणि तोंडात टाकले. परंतु एवढ्या लहान वयात घन पदार्थ योग्यप्रकारे गिळणे तिच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे चॉकलेट तिच्या घशात अडकलं आणि श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली.
कुटुंबीयांनी तिला तात्काळ उचलून बीड जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच छोट्या आरोहीने प्राण सोडले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
एका निष्पाप बालिकेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने काटवटवाडी गावात शोककळा पसरली आहे. घरच्यांचा आनंदाचा क्षण काही क्षणात दुःखदायी ठरला. नवजात बाळ येणे हे कुटुंबासाठी मोठं सुख असतं, परंतु त्याची काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं असतं, याची जाणीव या घटनेतून स्पष्ट झाली आहे.
याआधी मुंबईत एका साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात एलईडी बल्बचा धातूचा तुकडा अडकला होता. सुरुवातीला त्याला न्यूमोनियासारखी लक्षणं दिसत होती. दीर्घकाळ औषधोपचार करूनही त्याची प्रकृती सुधारत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धातूचा तुकडा आढळला. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी विशेष शस्त्रक्रियेद्वारे तो तुकडा काढून मुलाचा जीव वाचवला होता.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एवढ्या लहान वयातील बाळांना चॉकलेट, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, खेळणीचे तुकडे किंवा इतर कोणतेही लहान पदार्थ सहज घशात अडकू शकतात. त्यामुळे पालकांनी आणि कुटुंबीयांनी बाळांसमोर असे पदार्थ किंवा वस्तू ठेवू नयेत, अशी सूचना वारंवार केली जाते.