“या”मुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही – सुप्रिया सुळे

0
94

माणदेश एक्सप्रेस/इंदापूर : संतोष देशमुख खून प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे कायद्याचा धाक उरला नाही. कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सर्व पक्षाची बैठक बोलवावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चारशे कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे कबूल करत आहेत, तर चारशे कोटी नव्हे पाच हजार रुपयांचा घोटाळा झाला, असे त्यांच्याच पक्षातील आमदार सुरेश धस म्हणत आहेत, त्याची चौकशी का होत नाही हा प्रश्न आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही. हार्व्हेस्टरमागे सरकारने आठ लाख रुपये मागितले, असे राज्याचे कृषिमंत्री कोकाटे म्हणतात. तीन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, अशी कबुली ते देतात हा खूप गंभीर विषय आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण हा मुद्दा संसदेत मांडणार आहोत. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.

 

माझ्यासह, जितेंद्र पवार, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, अंजली दमानिया, नमिता मुंडदा व इतर असे नऊ जण व काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीक कराड यांना खूनप्रकरणी आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. राज्यातील सहा पक्ष सातत्याने ही मागणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी करत सरकार खुनी लोकांना का लपवत आहे, असा सवाल खा. सुळे यांनी उपस्थित केला.