फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल वापरताना सतर्क राहा

0
178

दादासाहेब कांबळे : जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : डिजीटल युगात स्मार्ट फोनव्दारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या जग कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) युगात पाऊल ठेवत असून त्यासाठी फार काळजी घ्यावी लागणार आहे. फसवणुकीचे स्वरूप बदलले आहे. यासाठी जागरूक असणे आवश्यक असून मोबाईल वापरताना सतर्क राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

 

 

 

 

श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे, ॲड. धन्यकुमार धावते, डॉ. बिराज खोलकुंबे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते, विद्यार्थी, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

ग्राहकांचे हक्क व त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगून अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले, ग्राहकांचे हक्क सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. मोबाईल वापरताना सुरक्षितता बाळगावी. वस्तु खरेदी करताना त्या वस्तुची गरज किती आहे, ती किती टिकेल, पर्यावरणाच्या दृष्टीने ती पूरक आहे का याचा विचार करणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विविध वस्तु खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीचा विमा उतरविताना त्याच्यातील अटी व शर्तींची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे, असे अधोरेखित करताना त्यांनी स्वानुभव सांगितला.

 

 

 

 

यावर्षीचे ग्राहक दिनानिमित्ताचे शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण (A Just Transition to Sustainable Lifestyle) हे घोषवाक्य आहे. या अनुषंगाने डॉ. बिराज खोलकुंबे यांनी उदाहरण देवून सविस्तर मार्गदर्शन केले. शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी आपल्या गरजा कमीत कमी ठेवा, अधिक अपेक्षा न करता आनंदाने जगावे. आपले उद्दिष्ट ठेवावे पण त्याच्या किती मागे लागावे याचा ज्याचा त्याने विचार करण्याची गरज आहे. स्वत: काय करायचे ते ठरवावे व स्वत:च्या मर्जीने जगावे. खाणे, कपडे, दैनंदिन उपक्रम व विचारावर आपली जीवनशैली दिसते. सध्या स्मार्ट फोनच्या वापरामुळे आपल्याला तातडीने कोणतीही माहिती मिळते. पण त्याचा व्यवस्थित वापर करावा. ग्राहक म्हणून व्यवस्था बदलण्याची ताकद ग्राहकांमध्ये आहे. त्यासाठी नागरिकांनी सदैव जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

 

 

 

ॲड. धन्यकुमार धावते यांनी ग्राहक संरक्षण कायदा तुलनात्मक अभ्यास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ग्राहकाची फसवणूक झाल्यास तो ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 50 लाख रूपये पर्यंत, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 50 लाख ते 2 कोटी रूपये पर्यंत व 2 कोटीच्या वर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो. यासाठी ग्राहकांनी संबंधित वस्तूबाबतचे बिल, वॉरंटी, गॅरंटी जपून ठेवावे असे सांगून त्यांनी कोणकोणत्या गोष्टीबाबत ग्राहक तक्रार न्यायालयात दाद मागता येते याची सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायद्याचा योग्य वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, ग्राहक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांनी डोळस होवून लिहीते व्हावे, झटावे जेणेकरून ग्राहकांना न्याय मिळेल. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकात सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी ग्राहक दिनाचा हेतू विशद करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात ई-शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here