
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मुंबईकरांना हादरवून टाकणारी एक भीषण घटना मंगळवारी मध्यरात्री वांद्रे-वरळी सी-लिंकवर घडली. राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या अंधेरी पश्चिम येथे वास्तव्यास असलेले व्यापारी अमित शांतीलाल चोप्रा (४७) यांनी मध्यरात्री टॅक्सी थांबवून अचानक समुद्रात उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अमित चोप्रा टॅक्सीने प्रवास करत होते. टॅक्सी वांद्रे-वरळी सी-लिंकवर पोहोचली तेव्हा त्यांनी अतिशय विचित्र वागणूक दाखवायला सुरुवात केली. प्रथम ते सापासारखा “फुसफुस” आवाज काढू लागले, त्यानंतर अचानक मोठ्याने “साप चावला” अशी ओरड केली. या घटनेमुळे घाबरलेल्या टॅक्सी चालकाने गाडी बाजूला थांबवली. पण, गाडी थांबताच चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि क्षणात समुद्रात उडी घेतली.
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे टॅक्सी चालक पूर्णपणे भेदरला. त्याने तातडीने सी-लिंकवरील कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम राबवली. काही तासांच्या प्रयत्नानंतर चोप्रा यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. घटनेची माहिती मिळताच चोप्रा यांच्या कुटुंबीयांना तातडीने संपर्क साधण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमित शांतीलाल चोप्रा हे मुंबईत इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करत होते. कुटुंबीयांसह ते अंधेरी पश्चिम येथे वास्तव्यास होते. काही व्यावसायिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यांच्या मनस्थितीमागील नेमकी कारणे अजून समोर आलेली नाहीत.
चोप्रा यांच्या आत्महत्येचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या नातेवाईकांची तसेच कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे.
ते खरोखरच आर्थिक अडचणीत होते का?
किंवा मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं का?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंकवर यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेची व्यवस्था असूनही वारंवार अशा घटना घडत असल्याने मुंबई पोलिसांपुढे सुरक्षा आव्हान उभं राहिलं आहे.