
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बांदा (उत्तर प्रदेश):
नात्यांना काळीमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बाबेरू कोतवाली हद्दीतील गौरीखानपूर गावात, वडिलोपार्जित मालमत्तेच्या केवळ एका फूट जमिनीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा त्याच्याच आई-वडिलांनी, भावाने आणि बहिणीने मिळून खून केला. मृत तरुणाची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती असून, तीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
२४ वर्षीय रामखेलावान हा आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर काही बांधकामाचे काम सुरू करत होता. याच दरम्यान त्याचा धाकटा भाऊ घटनास्थळी आला आणि जमिनीच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चिघळला आणि त्यात त्याचे वडील, आई आणि बहीणही सामील झाले. सर्वांनी मिळून रामखेलावानवर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रामखेलावानला त्याची पत्नी आरतीने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. आरतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “नवरात्रीच्या काळात जमिनीची वाटणी झाली होती. आम्ही आमच्या वाट्याच्या जमिनीवर बांधकाम करत होतो. पण या चार जणांनी माझ्या पतीचा केवळ एका फूट जमिनीसाठी खून केला. मी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. माझे पती कष्ट करून रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.”
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका फूट जमिनीच्या वादासाठी स्वतःच्या लेकराचा बळी देणाऱ्या आई-वडिलांबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आई-वडील आणि भावंडांपैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबात मालमत्तेच्या वाटणीवरून आधीपासूनच वाद सुरू होता. मात्र एवढ्या क्षुल्लक कारणासाठी संपूर्ण कुटुंबाने एका तरुणाचा जीव घेईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. गावात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
वडिलोपार्जित मालमत्तेवरून कौटुंबिक वादातून तरुणाचा खून
आरोपींमध्ये आई, वडील, भाऊ आणि बहीण सहभागी
पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती; “एका फूट जमिनीसाठी माझा नवरा गेला” – आरतीचा आक्रोश
बाबेरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तीन जण अटकेत