बनावट आयकर अधिकाऱ्यांनी डॉक्टरच्या घरात टाकला दरोडा; दोन कोटींपर्यंत मालावर हात साफ

0
270

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कवठेमहांकाळ :

बनावट आयकर अधिकाऱ्यांनी एका नामांकित डॉक्टरच्या घरी घुसून कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी (दि. १४) मध्यरात्री कवठेमहांकाळ शहरात उघडकीस आली आहे. या दरोड्यामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कवठेमहांकाळ शहरातील झुरेवाडी रोडवर राहणारे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे हे स्थानिकांमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचे “गुरुकृपा हॉस्पिटल” वसतिगृहासमोरच आहे. रविवारी रात्री साधारणपणे ११.३० ते १२.३० दरम्यान, स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत तीन पुरुष व एक महिला असे चार जण त्यांच्या घरात घुसले.


घरात शिरल्यानंतर या चौघांनी “आयकर विभागाची झडती” असल्याचे सांगून घरभर शोधाशोध सुरू केली. घरातील सर्व कपाटे, दराज आणि हॉलमधील सामान उचलून पाहण्यात आले. या दरम्यान त्यांनी सोन्याचे दागिने, रोकड अशी अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास किंमत असलेली मालमत्ता लंपास केली. ही टोळी छापा मारल्याच्या नावाखाली जवळपास एक तास घरात थांबली व डॉक्टरांच्या कुटुंबाला घाबरवून ठेवले.


घटना लक्षात आल्यानंतर डॉ. म्हेत्रे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मध्यरात्रीच कवठेमहांकाळ पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

सदर घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच शेजारी व प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या चार बनावट अधिकाऱ्यांच्या टोळीचा शोध सुरू केला असून लवकरच गुन्हेगार गजाआड करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


या घटनेनंतर कवठेमहांकाळ शहरात मोठी चर्चा रंगली आहे. रात्री उशिरा नामांकित डॉक्टरच्या घरी बनावट अधिकारी म्हणून दरोडा पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “बनावट अधिकारी घरात शिरून लाखोंचा ऐवज लंपास करत असतील तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

या दरोड्यामुळे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


  • झुरेवाडी रोडवरील नामांकित डॉक्टरच्या घरी घटना

  • आयकर अधिकाऱ्यांच्या नावाखाली घरात घुसलेले चार बनावट आरोपी

  • अंदाजे दोन कोटी रुपयांचा माल लंपास

  • सीसीटीव्ही व स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here