बच्चू कडूंची राज ठाकरेंना थेट मागणी — “शेतकऱ्यांसाठी मुंबई एक दिवस बंद करा!”

0
118

माणदेश एक्सप्रेस न्यूज मुंबई | विशेष प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चे दरम्यान कडूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती करत यवतमाळ जिल्ह्यातील नियोजित शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबई बंद करण्याची मागणीही त्यांनी राज ठाकरेंकडे केली.

 

 

शेतकऱ्यांसाठी ‘मुंबई बंद’चा प्रस्ताव

बच्चू कडूंनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “मुंबई अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे बंद झाली आहे. मात्र आजपर्यंत ती शेतकऱ्यांसाठी एक दिवसही बंद झाली नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथून शेतकऱ्यांच्या दुःखाचा आवाज उठला पाहिजे.”

 

 

“किमान काही तास तरी मुंबईने शेतकऱ्यांसाठी थांबावं,” अशी साद कडूंनी ठाकरेंना घातली.

 

आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन

कडूंनी स्पष्ट केलं की हे आंदोलन कोणत्याही पक्षासाठी नव्हे तर दु:खी आणि आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. “आमचा अजेंडा राजकारणाचा नाही. शेतकरी वाचवणे हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसेसारख्या पक्षाने या आंदोलनात सहभागी झाल्यास नक्कीच बळ मिळेल,” असे ते म्हणाले.

 

फडणवीस आणि सरकारवर सडकून टीका

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कडूंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील जोरदार टीका केली. “दुष्काळ पडल्यानंतरच कर्जमाफीचा विचार करू असे फडणवीस म्हणतात. म्हणजे सरकार दुष्काळाची वाट पाहतंय का?” असा संतप्त सवाल कडूंनी उपस्थित केला. गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यातूनच आत्महत्या वाढत आहेत, हे सरकारच्या लक्षात येत नाही का? असा सवालही त्यांनी केला.

 

 

व्हीव्हीपॅट निर्णयावर नाराजी

निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅट संदर्भातील निर्णयावरूनही कडूंनी नाराजी व्यक्त केली. “जर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसेल, तर ती थेट भाजप कार्यालयात घेऊन टाका,” अशी टोकदार टीका त्यांनी केली.

 

 

मनसे-प्रहार युतीवर भाष्य

“सध्या मनसे आणि प्रहार संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नाही,” असं स्पष्टीकरण कडूंनी दिलं. त्याऐवजी त्यांनी शेतकरी एकत्र येणं हाच खरा मुद्दा आहे, असं ठासून सांगितलं.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here