महामार्ग बांधकामावरून बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

0
31

माणदेश एक्सप्रेस न्यूज|अमरावती : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने २० हजार कोटींची तरतूद केल्यानंतर शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

 

“धनधान्य देणारी काळी आई हेच खरे शक्तिपीठ आहे. तिच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांना न्याय देणे हेच सरकारचे खरे कर्तव्य आहे. ८५ हजार कोटींचा महामार्ग आम्ही मागितला नाही, तो आमच्यावर थोपवू नका,” असा स्पष्ट इशारा बच्चू कडूंनी दिला.

 

राज्यभरात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. बच्चू कडूंनी यास सप्ट्या शब्दांत पाठिंबा दर्शवला आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी प्राधान्याने व्हायला हवी. महामार्गाच्या नावाखाली काही अडाण्यांचे खिसे भरण्याऐवजी भूमीच्या शक्तिपीठाचे रक्षण करा,” अशी बोचरी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक व्यंगचित्रही समाजमाध्यमांवर प्रसारित केलं असून त्याची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

 

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गामुळे १२ जिल्ह्यांतील ३६३ गावे बाधित होत असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर या विद्यमान महामार्गास जवळपास समांतर आहे. या दोन्ही मार्गांमधील अंतर केवळ २ ते ३० किमीच्या दरम्यान असल्याने नवीन महामार्गाची गरजच काय?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

 

राज्य सरकारने विद्यमान महामार्गाचेच चौपदरीकरण करणे शक्य असताना, नवीन ८६ हजार कोटींचा महामार्ग आखणे म्हणजे “संपत्तीचा अपव्यय आणि अडचणींचं आमंत्रण” असल्याचे मतही अनेक शेतकरी संघटनांनी मांडले आहे. बच्चू कडूंनी स्पष्टपणे आंदोलनकर्त्या सर्व संघटनांना पाठिंबा जाहीर करताना, हे आंदोलन केवळ राजकीय नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचेही स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here