
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. अमरावतीतून सुरू झालेलं शेतकऱ्यांचं “महाएल्गार आंदोलन” काल वर्धा पार करत आज नागपूरमध्ये दाखल झालं असून, संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीचं चित्र दिसतंय.
नागपूरच्या प्रमुख महामार्गांवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालं असून, रेल्वे रोखण्याचाही इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. “दुपारी १२ वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा रेल्वे थांबवू”, असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नागपूरच्या हायवेवर शेतकऱ्यांसोबत रात्र काढल्यानंतर सकाळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू भावूक झाले.
ते म्हणाले, “रात्र चांगली गेली, पण या शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिवस चांगला जात नाही. तीन-तीन, चार-चार लाखांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. व्याजावर व्याज होतंय, पिकांचं काय होणार, पुढच्या वर्षी बी-बियाणं कसं घेणार याची चिंता सगळ्यांच्या मनात आहे.”
कडूंनी पुढे सांगितलं, “आम्ही आमच्यासाठी लढत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबावी, त्यांच्या मुलांच्या डोळ्यातला अश्रू थांबावा, एवढाच आमचा हेतू आहे.”
या आंदोलनातून बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे केली आहे. त्यासोबतच त्यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत :
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
आपात्कालीन संकटामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २० टक्के अनुदान द्यावे.
उसाला प्रती टन ४,३०० रुपये एफआरपी द्यावी.
कांद्याला किमान ४० रुपये प्रतिकिलो दर द्यावा आणि निर्यातबंदी कायमची हटवावी.
गाईच्या दुधाला ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६५ रुपये प्रतिलीटर दर द्यावा.
या मागण्यांसह आंदोलनात शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, ग्रामपंचायत कर्मचारी आणि दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
प्रहार संघटनेच्या नेत्यांनी दिव्यांग नागरिकांसाठी खालील मागण्या मांडल्या आहेत :
केरळप्रमाणे दरमहा ₹६,००० रुपये पेन्शन मदत मिळावी (सध्या फक्त ₹१,००० ची वाढ दिली आहे).
प्रत्येक दिव्यांगाला अंत्योदय कार्ड दिले जावे.
सर्व रोजंदारी मजूरांचा मनरेगामध्ये समावेश करून प्रती महिना ₹१,००० मजुरी द्यावी.
सरकारतर्फे चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, बच्चू कडूंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
ते म्हणाले, “बावनकुळे येवो, वनकुळे येवो, का दोन कुळे असो… आम्हाला फरक नाही. आम्ही चर्चा सरकारशी करू. आमचा कोणी दुश्मन नाही. पण जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्या मनात खरंच असतं, तर निर्णय आजवर घेतला गेला असता.”
महामार्गावरील या आंदोलनामुळे नागपूर शहरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सकाळपासून हजारो वाहनं अडकली असून, प्रवाशांना लांबच लांब रांगेत थांबावं लागत आहे.
तरीही आंदोलकांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं आहे —
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढू शेवटच्या श्वासापर्यंत!”
बच्चू कडूंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला.
ते म्हणाले, “इथं कोण मुख्य आहे — महाराष्ट्राचं मी का मुख्यमंत्री? हा प्रश्न मला नाही, त्यांना विचारायला पाहिजे! दोष आमच्यात नाही, त्यांच्या धोरणात आहे. त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला असता तर आज शेतकरी रस्त्यावर आले नसते.”
सरकारने दुपारी १२ वाजेपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तर बच्चू कडूंनी रेल्वे रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागपूर पोलिस प्रशासन आणि रेल्वे विभाग दोन्ही सज्ज झाले आहेत.
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता नागपूरकडे लागल्या आहेत —
कर्जमाफी होणार का? की पुन्हा आंदोलन अधिक तीव्र होणार?


