
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर जोरदार लढा उभारलेल्या प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतरही आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी कर्जमाफीसाठी 31 जून 2026 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली. त्यानंतर कडू नागपूरात परतल्यानंतर प्रहार कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताना, “सरकारने दिलेला शब्द आम्ही मानतो, परंतु यात जर काही कट-कारस्थान झाले, तर आम्ही कोणालाही सोडणार नाही,” असा तीव्र इशारा दिला. तसेच “दगाफटका झाल्यास बच्चू कडू फासावर जाण्यासही तयार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भूमिकेची तीव्रता अधोरेखित केली.
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चव्हाट्यावर येण्यासाठी कडू यांनी नागपूरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. शेकडो ट्रॅक्टर, हजारो शेतकरी, आणि ‘कर्जमाफी द्या नाहीतर आम्ही थांबणार नाही’ असा निर्धार दाखवत झालेल्या या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेतकरी नागपुरात जमले होते.
या प्रचंड दबावानंतर सरकारने तातडीची बैठक बोलावली आणि अखेर कडू यांची मागणी मान्य केली.
कडू म्हणाले,
“शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच आजचा विजय शक्य झाला. त्यांच्या सहकार्यानेच सरकारला झुकावं लागलं.”
सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे कौतुक करतानाही कडू यांनी आरक्षण ठेवले. कडू म्हणाले,
“मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कठीण परिस्थितीत निर्णय घेतला याबद्दल आम्ही त्यांचे आभार. पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे… यात जर कुणी कट केला, शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शांत बसणार नाही.”
कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 31 जून 2026 ही डेडलाईन ठेवण्यामागे ठोस कारण आहे.
ते म्हणाले,
“यंदाचा रनिंग कर्जदार 31 मार्च 2026 ला गठित होणार आहे. जर आता कर्जमाफी घोषणा केली असती तर 2024-2025 च्या कर्जदारांचा लाभ राहिला नसता. त्यामुळे ही तारीख शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे.”
कडू पुढे म्हणाले,
“शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर बच्चू कडू मागे हटणार नाही. गरज पडली तर या लढ्यात फासावर जाण्यासही मी तयार आहे.”
कडू नागपूरात पोहोचताच कार्यकर्त्यांनी ‘जय शेतकरी, जय प्रहार’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महिलांनी आरत्या केल्या, शेतकऱ्यांनी पुष्पवृष्टी केली.
शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. सरकारने दिलेली डेडलाईन पूर्ण होईपर्यंत प्रहारची नजर सरकारवर असेल, हे कडूंच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनीही कडूंच्या लढ्याचे स्वागत केले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून या कर्जमाफीचा आराखडा पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
- सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी 31 जून 2026 ची डेडलाईन दिली 
- कडूंची तीव्र भूमिका : “कट झाल्यास सोडणार नाही, गरज पडली तर फासावर जाईन” 
- नागपूरात कडूंचे जल्लोषात स्वागत 
- आगामी काळात सरकारची परीक्षा, प्रहारची कडेकोट नजर 
शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांच्या संघर्षाला सध्या तरी यश मिळाले आहे. मात्र ही घोषणा व्यवहारात उतरेपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास टिकून राहील का? सरकार दिलेल्या शब्दावर ठाम राहील का?
याचे चित्र पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आशेची किरणे… आणि प्रहारच्या हातात आता विश्वासाची तलवार!
 


