
Baby Tooth Decay : लहान मुलांचे दात किडणे (Baby Tooth Decay) हा आजच्या काळात प्रत्येक दुसऱ्या घरात आढळणारा प्रश्न झाला आहे. अनेक पालक आपल्या बाळाला पटकन झोपवण्यासाठी झोपताना दूध पाजतात. ही सवय साधी वाटली तरी दातांच्या गंभीर समस्यांना आमंत्रण देते. बालदंततज्ज्ञांच्या मते, हीच सवय पुढे जाऊन दात किडणे, वेदना, दात गळणे आणि हिरड्यांच्या आजाराला कारणीभूत ठरते.
रात्री दूध पिणे आणि दात किडीचा थेट संबंध
बालदंततज्ज्ञ डॉ. नुपुर कुलकर्णी यांनी सांगितले की,
दूधामध्ये लॅक्टोज ही नैसर्गिक साखर असते.
बाळ दूध पिऊन लगेच झोपले, की ही साखर दातांवर चिकटून राहते.
रात्री झोपेत लाळेचे प्रमाण कमी होत असल्याने साखर तोंडातच राहते.
या वातावरणात जंतू झपाट्याने वाढतात व दातांवर प्लाक तयार होतो.
पुढे जाऊन किड सुरू होते आणि लहान वयातच दात गळण्याची समस्या उद्भवते.
बाळांच्या दात किडीची सुरुवातीची लक्षणे
पालकांनी खालील लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे:
दातांवर पांढरे किंवा पिवळसर डाग दिसणे
तपकिरी किंवा काळे डाग पडणे
खाण्याच्या वेळी किंवा ब्रश करताना वेदना होणे
बाळ सतत चिडचिड करणे किंवा रात्री रडणे
खाण्याची इच्छा कमी होणे
ही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
दात किडीपासून बचाव करण्यासाठी उपाय
✔️ दूधानंतर तोंड स्वच्छ करणे – मऊ कापड किंवा गॉजने दात व हिरड्या पुसाव्यात.
✔️ साखर मिसळलेले दूध टाळा – विशेषतः रात्रीच्या वेळी गोड दूध देऊ नका.
✔️ झोपताना बाटली तोंडात ठेवू नका – यामुळे दूध तोंडात साठते आणि जंतू वाढतात.
✔️ पाणी पाजण्याची सवय लावा – दूधानंतर थोडे पाणी दिल्यास अवशेष धुतले जातात.
✔️ लहानपणापासून ब्रशची सवय – १ वर्षाच्या पुढे मऊ ब्रशने दात घासायला शिकवावे.
डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?
काळे डाग, दुर्गंधी, दात सुटणे किंवा हिरड्यांमध्ये सूज यासारखी लक्षणे आढळल्यास बालदंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
योग्य ट्रीटमेंट वेळेत घेतल्यास पुढील नुकसान टाळता येते.
दात निरोगी राहिले तरच मुलाचे संपूर्ण आरोग्य टिकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
पालकांना बाळ पटकन झोपी जावे म्हणून रात्री दूध पाजण्याची सवय सोयीस्कर वाटते. पण हाच सोयीचा मार्ग पुढे गंभीर दंत समस्या निर्माण करणारा शत्रू ठरतो. त्यामुळे योग्य स्वच्छता, वेळोवेळी दंततज्ज्ञांचा सल्ला, आणि साध्या सवयी अंगीकारल्यास बाळांचे दात दीर्घकाळ निरोगी राहतील.