आयुष्य कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीचा म्होरक्याचा मुलगा  अखेर पोलिसांना शरण

0
131

माणदेश एक्सप्रेस न्युज | पुणे :

नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळीबार करून आयुष कोमकर याचा खून करणाऱ्या आंदेकर टोळीतील आरोपींमध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा काही दिवसांपासून फरार होता. आज अखेर तो पुणे पोलिसांसमोर हजर होत शरण आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी गुजरात सीमेवरून अटक केली होती. मात्र कृष्णा आंदेकर हा अद्यापही फरार असल्याने पोलिस त्याचा पाठलाग करत होते. दरम्यान, काही वेळापूर्वी तो स्वखुशीने पुणे पोलिसांकडे शरण आला आहे.


आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे आता एकूण १३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.


५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर (वय २०) हा आपल्या लहान भावाला क्लासवरून घेऊन नाना पेठेतील हमाल तालमीजवळील सोसायटीत आला. दुचाकी तळमजल्यावर पार्क करत असताना टोळीतील सदस्यांनी त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला आणि जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.


या घटनेनंतर आयुषची आई कल्याणी कोमकर (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत विशेष पथके तयार केली. काही आरोपींना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली होती, तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गुजरात आणि इतर राज्यांत रवाना करण्यात आले होते.


या खून प्रकरणात टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सर्व १३ आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, टोळीतील सर्व सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत.


पोलिसांच्या ताब्यात आलेल्या कृष्णा आंदेकरची कसून चौकशी केली जात असून, कोमकर खून प्रकरणातील नियोजन, शस्त्रास्त्रे आणि इतर आरोपींची माहिती काढण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here