
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत यावर भाष्य केले आहे.
औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. हे चुकीचे नाही. ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केले, त्यांच्याही खाणाखुणा आपण पुसून टाकल्या. आक्रमणकाऱ्यांच्या खाणाखुणा आपण पुसून टाकते. या औरंगजेबाने तर जुलमी राज्यकारभार केला. अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणे, समर्थन करणे, हे महाराष्ट्र सहन करणार नाही, माफ करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ला करून त्यांना जखमी करणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. त्यामध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवून द्वेष पसरवण्याचे काम केले जाते. नागपुरातील दंगल पूर्वनियोजित कट होता, असे वाटते. या भागात दररोज १००-१५० दुचाकी पार्क होत होत्या. मात्र तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष्य केले. पाच वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, अबू आझमींनी याची सुरुवात केली. त्यांना विशिष्ट समाजाची, विशिष्ट मतांची जुळवणी करायची आहे. विशिष्ट मते घेत असताना समाजात तेढ होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना निलंबित केले. जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी बाहेर येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


