मामा-मामीनेच नोकरीच्या आमिषाने भाचीची “एवढ्या” कोटींची फसवणूक

0
176

नागपूर | प्रतिनिधी

राज्यात शालार्थ आयडी घोटाळा गाजत असतानाच आता गडचिरोलीतील एका शिक्षण संस्थेच्या नावाखाली तब्बल १ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करणारे आरोपी हे पीडितेचे मामा-मामीच आहेत. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेचे नाव भारती संजय हरकंडे (वय ५०, न्यू अमरनगर, मानेवाडा) असे आहे. भारती यांचे मामा निळकंठ दशरथ दहीकर (६०), त्यांची पत्नी सविता दहीकर (५२), मुलगी आशू दहीकर (३०), पुतण्या राहुल दहीकर (३५), तसेच गुलाब धोंडबा दहीकर (४५) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे सर्वजण ‘शांतीवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्था’ या संस्थेशी संबंधित आहेत. निळकंठ दहीकर यांनी पीडित भारती यांना संस्थेचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवत २०११ ते २०२४ दरम्यान टप्प्याटप्प्याने १.२८ कोटी रुपये उकळले. या रकमेपैकी ४८ लाख रुपये अध्यक्षपदासाठी, ४५ लाख तिच्या जावयाच्या नोकरीसाठी, १५ लाख पतीस उपाध्यक्षपदासाठी आणि उर्वरित रक्कम इतर नातेवाइकांच्या नोकरीच्या नावावर घेतली गेली.

पैसे दिल्यानंतर ना कोणाला नोकरी मिळाली, ना भारती यांना अध्यक्षपद मिळाले. उलट संस्थेच्या अध्यक्षपदाचे बनावट ठरावपत्र, खोटे प्रमाणपत्र देण्यात आले. यावर भारती यांनी पैसे परत मागितल्यावर ४८ लाखांचा धनादेश दिला गेला, जो वटला नाही.

संजय हरकंडे हे सैन्यातून निवृत्त झाले असून सध्या खासगी व्यवसाय करत आहेत. त्यांनी व त्यांच्या पत्नीने आपले नातेवाईक असल्याच्या विश्वासावर एवढी मोठी रक्कम दिली होती. अखेर फसवणुकीची जाणीव झाल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here