आटपाडी तहसील कार्यालयात जि.प.व पं.स. साठी मतमोजणी ; चार जि.प. गट व आठ पं.स. गणांचे निकाल जाहीर होणार

0
847

माणदेश एक्सप्रेस न्यूज ; आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, करगणी, दिघंची व निंबवडे या चार जिल्हा परिषद गटांसह खरसुंडी, नेलकरंजी, करगणी, माडगुळे, दिघंची, विठलापूर, निंबवडे व घरनिकी या आठ पंचायत समिती गणांची मतमोजणी आज (दि. ०९) आटपाडी तहसीलदार कार्यालय येथे पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

मतमोजणीसाठी एकूण १९ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये एका टेबलावर टपाली मतदानाची मतमोजणी होणार असून उर्वरित १८ टेबलांवर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची सुरुवात खरसुंडी गटापासून होणार असून त्यानंतर अनुक्रमे करगणी, दिघंची व निंबवडे या गटांची मतमोजणी होणार आहे. सदरची मतमोजणी प्रक्रिया एकूण ११ फेऱ्यांमध्ये गट व गणनिहाय राबवली जाणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेचे कामकाज सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी १२२ अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून १ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस अधिकारी, १०० पोलीस अंमलदार व होमगार्ड यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतमोजणी ही गटनिहाय होणार असल्याने, एकाच वेळी संबंधित गटातील उमेदवार व त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. संबंधित गट व गणाच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तात्काळ निकाल जाहीर करण्यात येणार असून, मतमोजणी पूर्ण होताच विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेडगे व सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, प्रशासनाकडून निष्पक्ष, पारदर्शक व शांततेत मतमोजणी पार पाडण्यावर भर देण्यात येत आहे. निकालांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, आज संध्याकाळपर्यंत सर्व गट व गणांचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या गट व गणांची मतमोजणी?
जिल्हा परिषद गट ४
▪ खरसुंडी ▪ करगणी ▪ दिघंची ▪ निंबवडे
पंचायत समिती गण ८
▪ खरसुंडी ▪ नेलकरंजी ▪ करगणी ▪ माडगुळे ▪ दिघंची ▪ विठलापूर ▪ निंबवडे ▪ घरनिकी

मतमोजणीची टेबलनिहाय व्यवस्था
▪ एकूण टेबल : १९
▪ टपाली मतदानासाठी : १ टेबल
▪ ईव्हीएम मतमोजणीसाठी : १८ टेबल
▪ मतमोजणी फेऱ्या : एकूण ११ फेऱ्या
▪ मतमोजणी पद्धत : गट व गणनिहाय

कडेकोट पोलीस बंदोबस्त
▪ पोलीस उपअधीक्षक : १
▪ पोलीस अधिकारी : १०
▪ पोलीस अंमलदार व होमगार्ड : १००

प्रशासनाची तयारी व नियमावली
▪ प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी : १२२
▪ उमेदवार व प्रतिनिधींनाच प्रवेश
▪ एकावेळी फक्त संबंधित गटाचे प्रतिनिधी
▪ फेऱ्या पूर्ण झाल्यावर तात्काळ निकाल जाहीर
▪ विजयी उमेदवारांना लगेच प्रमाणपत्र वितरण


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here