आटपाडी रस्ता प्रकरण : ११ मीटरवर भाजप ठाम, १४ मीटरवर शिवसेना–राष्ट्रवादी आग्रही ; रुंदी कमी-जादा वाद, शहरात तणावाचे वातावरण

0
1

आटपाडी : शहरातील साई मंदिर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, शहरात संघर्षाची ठिणगी पेटली आहे. रस्त्याची रुंदी ११ मीटर ठेवायची की पूर्वीप्रमाणे १४ मीटर करायची, या प्रश्नावर दोन प्रमुख राजकीय गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. विकास, नागरिकांचे नुकसान, मंजुरी आणि निधी याभोवती फिरणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

शहरातील या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत पूर्वी १४ मीटरचा प्रस्ताव होता, अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ठामपणे मांडली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त करत, “रस्ता पूर्वी मार्किंग केल्याप्रमाणेच १४ मीटर रुंदीने करावा,” अशी जोरदार मागणी केली. शहर विकासासाठी रुंद रस्ते आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत, सध्याची रुंदी कमी केल्याने भविष्यातील वाहतूक व नियोजनावर परिणाम होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दुसरीकडे, भाजप नेते व नगरपंचायतमधील पदाधिकाऱ्यांनी वेगळीच भूमिका घेत आक्षेप नोंदवला आहे. भाजप नेते अमरसिंह देशमुख, नगराध्यक्ष उत्तम जाधव, नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत “रस्ता सध्या जसा ११ मीटर रुंदीने सुरू आहे, तसाच ठेवावा,” असा ठाम सूर उमटला. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरसीसी बांधकामांवर गदा येऊ नये, लोकांचे नुकसान करून रुंदी वाढवणे योग्य नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.

बैठकीदरम्यान अमरसिंह देशमुख यांनी स्वर्गीय आमदार अनिलमाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याचा उल्लेख करत, “रस्ता मंजुरी त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळाली. निधी आणल्याचा दावा करून कोणी श्रेय घेऊ नये,” असा स्पष्ट संदेश दिला. “लोकांची घरे, दुकाने आणि आरसीसी बांधकामे पाडून विकास नको. जेथे शक्य आहे तेथे रस्ता वाढलाच आहे. मात्र आता जबरदस्तीने १४ मीटर रुंदीचा आग्रह धरणे म्हणजे नागरिकांवर अन्याय,” अशी टीका त्यांनी केली.

रस्त्याची रुंदी कमी ठेवण्यावर भाजप नेते आग्रही असताना, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पूर्वीच्या १४ मीटर प्रस्तावावर ठाम आहेत. त्यामुळे शहरात राजकीय संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूंनी विकासाच्या मुद्द्यावर आपापली भूमिका मांडत असताना, नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. काही नागरिकांनी रुंदी वाढल्यास वाहतुकीची समस्या सुटेल, असे मत व्यक्त केले; तर अनेकांनी मालमत्तेचे नुकसान टाळावे, अशी भूमिका घेतली.

या वादामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रस्त्याचे अंतिम मोजमाप, पूर्वीचे मार्किंग, तांत्रिक मंजुरी आणि नागरिकांचे हित यांचा समतोल साधत निर्णय घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. मात्र, सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

दरम्यान, शहरातील या महत्त्वाच्या रस्त्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे आगामी काळात आंदोलन, मोर्चे किंवा राजकीय शक्तिप्रदर्शनाची शक्यता नाकारता येत नाही. आटपाडीकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विकास विरुद्ध नुकसान या द्वंद्वात अडकलेल्या या रस्त्याच्या वादाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here