
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शाळा आणि कार्यालयीन वेळेनुसार आटपाडी-मुढेवाडी-निंबवडे-वाक्षेवाडी या मार्गाने एसटीची फेरी सुरू झाली आहे. या फेरीमुळे शाळा आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, पण आता खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी राव पाटील, लोकमान्य हायस्कूलचे मुख्याध्यापक युवराज पिंजारी आणि स्थानिक नेतेमंडळी यांच्या प्रयत्नांमुळे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
या नवीन एसटी फेरीचे पूजन निंबवडे नगरीचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत भाऊ सरगर आणि अनेक शिक्षक-विद्यार्थी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
निंबवडे, मुढेवाडी, वाक्षेवाडी व आसपासच्या गावांतील विद्यार्थी आणि नागरिक यांना आता शाळा-कार्यालयाच्या वेळेनुसार प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे आणि प्रवासातील त्रास कमी होणार आहे. स्थानिकांनीही या सेवेसाठी समाधान व्यक्त करत, भविष्यातही अशा सुविधा अधिक वाढवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.