
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीने वसुलीसाठी मोठी मोहीम राबविली आहे. वसुलीसाठी स्वत: मुख्याधिकारी वैभव हजारे मैदानात उतरले असून, कर्मचाऱ्यांच्या बरोबर जात त्यांनी वसुलीला वेग दिला आहे. परंतु अद्याप ही मोठे थकबाकीदार घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास तयार नसल्याने, या थकबाकीदारांची नावे असलेले डिजिटल नगरपंचायतीच्या समोर लावले असून, सदरचे डिजिटल मध्ये आपले नाव आहे हे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. नगरपंचायतीच्या या आक्रमक भुमिकेमुळे मात्र आता थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगली गेली असून, चांगलीच पंचाईत झाली आहे.
आपण राहत असलेल्या घराचे पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती कर करणे भरणे हे सर्वसामान्य नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. याचे सामान्य नागरिक तंतोतंत पालक करत असतात. वेळोवेळी आपली नगरपंचायतीचा कर भर सहकार्य करत असतात. याउलट राजकीय पाठबळाच्या जोरावर अनेक स्वत:ला मोठे समजणारे मात्र नगरपंचायत आपल्या मालकीची असल्या सारखे वागत घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर टाळत असतात. अपेक्षित वसुली होत नसल्याने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार, विकास कामे याचा मोठा ताण नगरपंचायतीवर पडत असतो.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी यावर मार्ग काढत १० हजार रुपयांच्या वर थकबाकी असलेल्यांचे डिजिटल करून ते नगरपंचायतीच्या समोर लावले आहे. या डिजिटलमुळे मात्र थकबाकीदार असलेल्यांचे धाबे दणाणले असून, आपले नाव थकबाकीदार यादीत आहे का? पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. यातील काहींनी आपले नाव पाहून आपली थकबाकी नगरपंचायतीकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे.