
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथील अंगणवाडी सेविका वहिदा सय्यद काझी यांच्यावर शासनाची दिशाभूल करून नोकरीचा लाभ घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून याबाबत सविस्तर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चिंचाळे येथील सुरैय्या रफिक काझी यांनी जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. यापूर्वीही दिनांक २९ सप्टेंबर २०२५ व १६ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित विभागाकडे अर्ज दिला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित अंगणवाडी सेविका गेल्या सुमारे १४ वर्षांपासून कार्यरत असून शासनाच्या नियमांनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीस शासकीय नोकरी किंवा लाभ घेता येत नाही. मात्र संबंधित सेविकेला तीन मुले असून त्यापैकी एक मूल २०१० नंतरचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्यांनी शासनाची दिशाभूल करून नोकरी कायम ठेवली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
तसेच संबंधित मुलांच्या जन्मनोंदींचे पुरावे मिळवण्यासाठी तक्रारदारांनी जिल्हा परिषद शाळा, गायकवाड वस्ती (चिंचाळे) येथे अर्ज केला होता. मात्र मुख्याध्यापकांनी माहिती देण्यास नकार दिल्याने पुरावे सादर करण्यात अडचणी आल्याचेही अर्जात नमूद आहे.
दरम्यान, एकात्मिक बालविकास सेवा योजना, आटपाडी प्रकल्प कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व चौकशी अधिकारी यांनी प्रकरणात टाळाटाळ करत चुकीच्या पद्धतीने चौकशी सुरू ठेवल्याचा तसेच संबंधित सेविकेशी संगनमत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित सेविकेला सेवेतून बडतर्फ करावे, शासनाला झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
तक्रारीची प्रत महिला व बाल विकास मंत्री, पालकमंत्री सांगली, शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली असून प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


