
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, तर काही ठिकाणी नदीकाठच्या जमिनीची सुपीक माती वाहून गेली. लाखो हेक्टर क्षेत्रातील पिकं पाण्यात बुडून नष्ट झाली आहेत. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील.”
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील. राज्यभरात पंचनामे सुरू असून प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानाची आकडेवारी जमा केली जात आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासन सर्वतोपरी मदत करण्याच्या तयारीत आहे.
कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नदीकाठच्या जमिनीची सुपीक माती वाहून गेली असेल किंवा अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान झाले असेल, तरीही अशा शेतकऱ्यांनाही मदतीतून वंचित ठेवले जाणार नाही. राज्य सरकारने नुकसानीची योग्य भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुसळधार पावसामुळे पीकहानी झाल्याने बळीराजा संकटात सापडला होता. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची भरपाईची घोषणा ही दिलासादायक ठरणार आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाआधी आर्थिक मदत मिळाल्याने शेतकरी वर्गाला थोडा श्वास घेता येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वाची मानली जात आहे. “शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, त्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य ती मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल,” असा विश्वास कृषीमंत्री भरणे यांनी व्यक्त केला आहे.


