अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा : कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

0
222

माणदेश एक्सप्रेस | मुंबई :

राज्यात सलग तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने कहर माजवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पुरस्थिती आणि वादळी पावसामुळे शेती, घरं आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.


कृषीमंत्री भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “यंदा राज्यात जवळपास ७० लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या व ओढ्यालगतच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. फक्त शेतीच नव्हे तर पशुधन, घरं आणि मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये तर कंबरेपर्यंत पाणी शिरले आहे.”


भरणे यांनी स्पष्ट केले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पंचनामे करण्याचे आदेश युद्धपातळीवर देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, काही पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित गावांमध्ये तातडीने सुरू केले जातील.
“ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्यांना नुकसान भरपाई वितरित केली आहे. बाकी शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी मदत मिळेल,” असे आश्वासन भरणे यांनी दिले.


सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नुकसान भरपाई दिली जाते. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे निकषांच्या चौकटीत न अडकता शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल, असे भरणे यांनी जाहीर केले.
“हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, आणि या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत चांगला निर्णय नक्की होईल,” असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.


राज्यातील शेतकरी सततच्या पावसामुळे हवालदिल झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात हजारो एकरवरील खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही होत आहे. सरकारकडून दिवाळीपूर्वी थेट खात्यात नुकसान भरपाई मिळेल, अशी घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये थोडाफार दिलासा निर्माण झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here