
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी
आटपाडी तालुक्यातील पुजारीवाडी परिसरात तरस हा वन्यप्राणी दिसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील शेतात हा तरस दिवसाढवळ्या फिरताना दिसला असून, शेतकरी विष्णू बालटे यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दिवसाढवळ्या शेतात तरस फिरत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील शेतकरी वर्गाने भीती व्यक्त केली आहे. शेतकरी कामासाठी शेतात जात असताना हा प्राणी कुठल्याही क्षणी समोर येऊ शकतो, या भीतीने शेतकरी आता सावधपणे काम करत आहेत.
शेतकरी विष्णू बालटे यांनी सांगितले की, “तरस पिकांच्या मधून सहज फिरत होता. दिवसाढवळ्या तो दिसल्याने आम्ही सर्व घाबरलो. वन विभागाने तातडीने लक्ष घालून या प्राण्याला सुरक्षितरीत्या पकडावे, अशी आमची मागणी आहे.”
तरस हा प्राणी साधारणतः रात्री किंवा पहाटे सक्रिय असतो. मात्र दिवसाढवळ्या तो दिसल्याने परिसरात अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही एकत्र येऊन शेतांमध्ये गस्त वाढवली आहे.
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, तरस दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून प्राण्याला इजा न होता त्याला योग्य ठिकाणी हलवता येईल.
View this post on Instagram