आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025 : तिसऱ्या दिवशी नगरसेवकपदासाठी सात तर थेट नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

0
985

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, दिवसभर निवडणूक कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वातावरणात राजकीय चर्चा, गटबाजी, गणिते आणि संभाव्य लढतींची कुजबुज सुरू असताना एकूण सात नगरसेवक पदांचेदोन नगराध्यक्ष पदांचे अर्ज सादर झाले.

थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणुकीचे मैदान अधिकच तापवले आहे. शिवसेनेतर्फे आप्पासो नानासो माळी यांनी दमदार उपस्थितीत अर्ज दाखल केला, तर हरिष धनाजी खिलारी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

नगरसेवक पदांसाठीही विविध प्रभागांत अर्ज दाखल होताच स्थानिक राजकारणात हळूहळू चुरस निर्माण होत आहे. प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेचे शहाजी यशवंत जाधव यांनी अर्ज दाखल करत पक्षाचा दावा मजबूत केला. याच प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पोपट मारुती पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे.

प्रभाग क्रमांक बारा मध्ये शिवसेनेचे डॉ. विनय जयराम पतकी यांनी दोन स्वतंत्र अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  प्रभाग क्रमांक तेरा मध्ये गणेश प्रभाकर माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी नोंदवत या विभागात स्वतंत्र ताकद दाखवण्याचे संकेत दिले.

प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शिवसेनेच्या अर्चना मनोज नांगरे यांनी अर्ज दाखल केला. त्याचवेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समाबाई भिमराव काळे यांनीही अर्ज दाखल केला आहे.

तिसऱ्या दिवशी दाखल झालेल्या अर्जांची संख्या वाढत असली तरी महत्त्वाचे म्हणजे विविध प्रभागांमध्ये आता कोणत्या गटातून किती उमेदवार उतरणार, किती ठिकाणी बहुकोनी लढत निर्माण होणार आणि कुठे थेट दोन गटांमध्ये झुंज दिसणार याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. आगामी दोन दिवसांत उमेदवारी अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने निवडणुकांचे वातावरण अधिकच तापेल, असे संकेत मिळत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here