
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. तसंच मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही सगळ्यांच्या बोलण्याला तोंड दिलंत आणि यशस्वी झाला आहात, शतायुषी व्हा. असं म्हणत एकनाथ शिंदेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याचवेळी एका कार्यक्रमात त्यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देताना त्यांनी शिवसेना कशी घडवली ते देखील सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नावही त्यांनी घेतलं आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले होते. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतर महायुतीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं. महाराष्ट्रात महायुतीला २३७ जागा मिळाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. आशा भोसले यांनी बाळासाहेब ठाकरेंनी जशी शिवसेना उभी केली तशीच शिवसेना तुम्ही उभी केली म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे.
आशा भोसले यावेळी म्हणाल्या, “तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. कारण, त्यावेळेला सगळं काही निवळलं होतं, त्यावेळी तुम्ही आलात. ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तु्म्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही”. असं आशा भोसले यांनी म्हटलं आहे.