माणदेश एक्सप्रेस न्युज/पलूस : सांगली जिल्ह्यातील पलूस आंधळीमध्ये उष्माघाताने तब्बल 1200 बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं उष्माघातानं कोंबड्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये पोल्ट्री मालकाचे लाखो रुपयांचं नुकसान झाले.
सांगलीतील पलूस तालुक्यातील आंधळीमध्ये उष्माघातामुळं तब्बल 1200 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिताराम जाधव यांचे आंधळीमध्ये पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली. या पोल्ट्री मार्फमध्ये 4200 बॉयलर कोंबड्या आहेत. बुधवारी दुपारी या पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळं उष्माघातामुळे 1200 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये सिताराम जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय. जाधव यांनी आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
अलिकडच्या काळात अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये फॉगर, स्प्रिंकलर, फॅन, बारदान पोती, पत्र्याच्या शेडवर उसाचे पाचट टाकून त्यावर पाणी मारणे अशा उपाययोजना करत आहेत. तरीही उष्णतेमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पक्ष्यांचे वजनही घटत आहे. सध्या दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी वादळी वाऱ्यासह काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, पोल्ट्रीतील पिल्ले नाजूक असतात. त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळं उष्णतेच्या झळेमुळं कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. याचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसत आहे.
दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळं पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सोबतच अंडी उत्पादनातही घट होत असल्याचं चित्र दिसत आहे. उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळं कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही. त्याचा व्यवसायाला फटका बसत आहे. त्यामुळं पोल्ट्री व्यावसायिकांसमोर सध्या अनेक अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करत ते मार्ग काढताना दिसत आहेत.