
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
तासगाव तालुक्यातील आरवडे (ता. तासगाव) येथे सोमवारी (दि. 25) सकाळी एका तरुणाचा मृतदेह घरातील खोलीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या गळ्याभोवती फास लावल्याच्या खुणा व डोळ्याभोवती जखमा असल्याने हा मृत्यू नैसर्गिक नसून खून असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. संग्राम राजाराम वाघ (वय 25, रा. आरवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घटनाक्रम
सोमवारी सकाळी संग्रामचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील (रा. वाघापूर) हा घरी आला असता संग्राम हा घरातील दुसऱ्या खोलीत जमिनीवर पालथा पडलेला दिसला. त्याची काहीच हालचाल नसल्याने आशिष व संग्रामची आई यांनी त्याला उताणे केले. त्यावेळी त्याच्या उजव्या डोळ्याजवळ खोलवर जखम दिसून आली, तसेच जखमेतून रक्तस्त्राव झालेला होता. याशिवाय त्याच्या गळ्याभोवती फास लावल्याचे व्रण स्पष्ट दिसून येत होते.
तातडीने गावातील खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संग्रामला तपासल्यानंतर तो मृत झाल्याचे सांगितले.
पोलिसांची धाव
घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळताच पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला. त्यानंतर सांगली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथकही घटनास्थळी दाखल झाले.
संग्रामच्या मृतदेहाचे तासगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व्हिसेरा तपासासाठी राखून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर डॉक्टर तानाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृताच्या भुवईवर जखम व गळ्याभोवती फासाचे व्रण असल्याचे स्पष्ट झाले.
गावात उलटसुलट चर्चा
तरुणाचा मृतदेह घरात सापडल्याने गावात प्रचंड खळबळ माजली आहे. घटनास्थळ व मृतदेहाची अवस्था पाहता प्रथमदर्शनी हा खून असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण पथक व तासगाव पोलिसांकडून सुरू असून, व्हिसेरा तपासानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.