१७ वर्षांची कैद संपली; नागपूर तुरुंगातून बाहेर पडला ‘डॅडी’

0
332

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये ‘डॅडी’ म्हणून ओळखला जाणारा कुख्यात गँगस्टर आणि नंतर राजकारणात प्रवेश केलेला अरुण गवळी १७ वर्षांच्या दीर्घ तुरुंगवासानंतर अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयानंतर, नागपूर सेंट्रल कारागृह प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, आज दुपारी सुमारे १२.३० वाजता गवळीची सुटका केली. पोलिस सुरक्षा ताफ्यातून तो नागपूर विमानतळावर दाखल झाला आणि तेथून तो मुंबईकडे रवाना झाला.


अरुण गवळी हा मुंबईच्या दगडी चाळीतून उभा राहिलेला एक प्रभावशाली चेहरा आहे. ८०–९० च्या दशकात दाऊद इब्राहिम व अन्य अंडरवर्ल्ड डॉनच्या विरोधात त्याने आपले स्वतंत्र साम्राज्य उभारले. खून, खंडणी, धमक्या यांतून त्याचा गँग कुख्यात झाला. गवळीला ‘डॅडी’ ही उपाधी मुंबईतील सामान्य जनता व स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.

परंतु केवळ गुन्हेगारीतच अडकून न पडता, गवळीने राजकीय पायाभरणी केली. त्याने ‘अखिल भारतीय सेना’ हा पक्ष स्थापन केला आणि २००४ ते २००९ या काळात चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला.


सन २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येत गवळीचा सहभाग उघडकीस आला. २०१२ मध्ये विशेष एमसीओसीए न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर गवळी नागपूर सेंट्रल कारागृहात शिक्षा भोगत होता.


एप्रिल २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००६ मधील राज्य पुनर्मुक्ती धोरणाचा दाखला देत, गवळीला मुदतपूर्व सुटका मिळावी असे आदेश दिले. कारण तो ६५ वर्षांचा आहे आणि त्याने १४ वर्षांहून अधिक तुरुंगवास पूर्ण केला आहे. तथापि, जून–जुलै २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश स्थगित ठेवत पुढील सुनावणीसाठी प्रकरण पुढे ढकलले. अखेर २८ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीला जामीन मंजूर केला.


गवळीच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात आणि सामाजिक वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन म्हणून भय निर्माण करणारा गवळी आता पुन्हा राजकीय भूमिका घेईल का? की निवृत्त जीवनाचा पर्याय निवडेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबईच्या स्थानिक राजकारणात गवळीचा प्रभाव कायम राहिला होता. अनेक कार्यकर्ते त्याच्या विचारांशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्याच्या सुटकेमुळे स्थानिक पातळीवर काही समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here