
2 दिवस आधीच देवगडमध्ये दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : संपूर्ण राज्यासाठी आणि बळीराजासाठी आनंदाची बातमी असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तब्बल 12 दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 7 जूनला मान्सून दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
नैऋत्य मान्सूनने भारतात एण्ट्री केली असून केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग, संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील तळकोकण व्यापला आहे. तळकोकणातील देवगडमध्ये मान्सून दाखल झाला असून पुढचे पाच दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या तीन दिवसात मान्सूनसाठी पूरक परिस्थिती असून महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता मुंबईतील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढच्या पाच दिवसांसाठी कोल्हापूर, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदु्र्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली-साताऱ्याच्या काही भागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण-गोवा (दक्षिण) जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्यम महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्यम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट सुरू आहे. या परिसरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे झंझावाती वारे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.