
माणदेश एक्स्प्रेस / पुणे : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने रविवारी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. अशात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी तीन ओळींचे एक ट्विट केले आहे. ‘हा तर आपल्यासारखा निघाला. हा सुद्धा झुकणार नाही. जय महाराष्ट्र!’, असं ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे.
तर आज पुण्यात कुणाल कामरा प्रकरणावरून पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी केली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने बॅनरबाजी केल्याचे या बॅनरवरील मजकुरातून लक्षात येते. ठाणे, रिक्षा, चष्मा ,दाढी , गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?” असा प्रश्नही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्यासह कुणाल कामरा यांचा फोटोही लावण्यात आला आहे.(स्त्रोत-लोकमत)