
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमुळे महायुतीत वादाची ठिगणी पडली आहे. अजित पवारांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मंत्री अदिती तटकरेचं उपस्थित होत्या. शिवसेनेच्या एकाही आमदाराला याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आमदारांना नाराजी लपवता आली नाही. या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हे शिवसेनेच्या आमदारांसोबत जाणीवपूर्वक सुरू आहे का? असा सवाल केला.
शिवसेनचे आमदार महेंद्र थोरवे या बैठकीबद्दल बोलताना म्हणाले, “आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, मग आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही?”, असा सवाल महेंद्र थोरवे यांनी केला.
“आम्हाला यासंदर्भात माहिती देण्याची जिल्हाधिकाऱ्यांचीही जबाबदारी होती. परंतू अजित पवारांच्या दालनात ती बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला आमदारांना डावलण्यात आले. आमदारांना माहिती दिली गेली नाही. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातही प्रश्न आहेत. हे प्रश्न आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोडवायचे असतात. मग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला बैठकीला बोलवायला हवे होते”, अशा शब्दात महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली.
“माझ्या मते रायगड जिल्ह्यात जे काही आता राजकारण सुरू आहे. हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीला फक्त मंत्री असत नाही, आमदार-खासदार सगळे उपस्थित असतात. पण, हे जाणीवपूर्वक आम्हाला त्याठिकाणी बोलवण्यात आलं नाही. याचं कारण आम्हाला समजलं नाही”, असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी बैठकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.