
माणदेश एक्सप्रेस न्यूज
दादर परिसरात कबुतरखाना हटवण्याच्या वादामुळे कबुतरांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जैन धर्मात कबुतरांना विशेष महत्त्व आहे आणि अनेकजण त्यांना धान्य टाकतात. मात्र, कबुतरांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
दिल्लीतील एका 11 वर्षांच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस हा गंभीर फुफ्फुसाचा आजार आढळला, जो कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांच्या संपर्कामुळे झाला होता.
संशोधनानुसार, एक कबुतर दरवर्षी सुमारे 11.5 किलो विष्ठा सोडतो. या विष्ठेत असलेल्या बुरशी आणि किटकांमुळे विविध आजार होऊ शकतात. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस, सायटाकोसिस आणि हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस यांचा समावेश होतो.
या आजारांमध्ये मुख्य लक्षणे म्हणजे श्वास घेण्यास त्रास, दीर्घकाळ खोकला, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, सांधेदुखी आणि त्वचारोग होऊ शकतात.
कबुतरांना खायला देताना किंवा त्यांच्याशी संपर्क साधताना आरोग्याचा धोका लक्षात घेऊन योग्य खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विष्ठा नियमित साफ करणे, मास्क वापरणे आणि स्वच्छता पाळणे हाच यापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.