अंतर्गत नाराजी नाट्यामुळे पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती

0
224

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे समजते. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सोमवारी दिला असला तरी यातून महायुतीत धुसफुस समोर आली आहे.

 

आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यामागे दिल्लीचा हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापू्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या यादीला दिल्लीतील भाजप नेतृत्वाने मान्यता दिली होती. रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिंदे गट आग्रही होता.

 

पालकमंत्रीपदावर झालेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असली तरी २६ जानेवारीला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्याच हस्ते झेंडावंदन होईल, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. बीडची कन्या असल्याने बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर चांगले झाले असते, अशी भावना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पंकजा यांच्याकडे जालन्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.