
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील व्यक्तींकरीता महामंडळाच्या भागभांडवली अंशदानाच्या निधीतून 1 लाख रूपये पर्यंत प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यासाठी कर्ज मागणी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 एप्रिल 2025 पर्यंत आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
‘
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज याजनेंतर्गत महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक उद्दिष्टानुसार सांगली जिल्ह्यासाठी भौतिक उद्दिष्ट 30 आहे. थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम 1 लाख रुपये करण्यात आली असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा 85 हजार रुपये (85 टक्के), अनुदान रक्कम 10 हजार रुपये (10 टक्के), लाभार्थी सहभाग 5 हजार रुपये (5 टक्के)असे एकूण 1 लाख रुपये (100 टक्के) आहे. तरी विहीत मुदतीत कर्ज मागणी प्रस्ताव संबंधितांनी सादर करावेत. लाभधारकाने कर्ज प्रस्ताव स्वत: कार्यालयात दाखल करावा. त्यासाठी कोणतेही मध्यस्थ नेमलेले नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.