
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर –
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समोर नेतृत्व संकट गडद होत चाललं आहे. महाविकास आघाडीतील पराभवानंतर अनेक नेते दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील ज्येष्ठ नेते उत्तम जानकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सोलापूर जिल्ह्यात तापली आहे.
एका जाहीर कार्यक्रमात जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जाहीर कौतुक करताना, “कर्णानंतर शिंदेच सर्वात दानी व्यक्ती आहेत. मी ४० वर्षं राजकारणात आहे पण शिंदेसारखा दिलदार नेता कधी पाहिला नाही,” असे उद्गार काढले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू झाली.
यावर प्रतिक्रिया देताना माळशिरसचे माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र व युवा नेते संकल्प डोळस यांनी थेट आरोप करत म्हटलं, “उत्तम जानकर हे आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशा नेत्यांमुळे पक्षाला नुकसान होत आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे जुने व जाज्वल्य नेते मानले जातात. त्यांनी ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभं करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या एकनाथ शिंदेंवरील स्तुतिसुमनांमुळे त्यांची पक्षनिष्ठा चर्चेत आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. महाविकास आघाडीला मिळून फक्त ५० जागांवर समाधान मानावं लागलं, तर महायुतीने २३२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता शरद पवार गटात नाराजीचे सूर आणि नेत्यांची गळती सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
जानकर यांच्या संभाव्य निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर तो शरद पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.