पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर ! दिव्यांग प्रमाणपत्रासाठी असा केला होता खेळ

0
368

प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकएक कारनामे समोर येत आहे. सध्या नॉट रिचेबल असलेल्या पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी कसा खेळ केला आहे, त्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आली आहे. त्यांना देण्यात आलेले ‘आधार कार्ड’ टीव्ही 9 च्या हाती लागले आहे. त्यांच्या ‘रेशन कार्ड’ आणि आधारकार्डवर पत्ता वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांना दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र नियमानुसार आहे का? असा प्रश्न चर्चेत आला आहे. आता त्यांच्या प्रमाणपत्रासंदर्भात डॉक्टरांना दिलेल्या क्लिन चिटवर प्रश्न निर्माण झाला आहे.

आधार कार्डचाही केला वापर
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मेमोलियल रुग्णालयात आधार कार्ड देखील दिले आहे. त्यानंतर त्यांना 7 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र रुग्णालयाने दिल होते. या आधी केवळ रेशन कार्ड दिल्याचे सांगण्यात येत होते. अखेर रुग्णालयाचे डिन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचे म्हटले होते. ते आधार कार्ड ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहे.

दोन ओळखपत्रे अन् दोन पत्ते
पूजा खेडकर यांनी दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले आहे. त्यांना आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला आहे तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता. यामुळे पूजा खेडकर यांना दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे खरच नियमाला धरून देण्यात आले का? तसेच त्यासंदर्भात डॉक्टरांना दिलेली क्लिन चिट यावर प्रश्न निर्माण होत आहे.

पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दखल घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. त्यांनी जर दखल घेतली नाही तर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, यासाठी आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहिल आहे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.