भाजपला आणखी एक धक्का, ‘या’ माजी आमदाराची शिवसेनेत वापसी, उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा पक्ष सोडायचा प्रयत्न केला तर?

0
528

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला  चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह  शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत. आता, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे, ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला असून त्यांचा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर, त्यांच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या मतदारसंघात आणखी ताकद मिळाली आहे.

मी फक्त शिकायला गेलो होतो
दरम्यान, रमेश कुथे यांचा पक्षप्रवेश होताना उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला. मी शिवबंधन बांधतो, पण परत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर?, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, मी पक्षासोबतच होतो, फक्त तिकडे शिकायला गेलो होतो, असे उत्तर रमेश कुथे यांनी दिले.

विदर्भात शिवसेना ठाकरे गट सक्रीय
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी, विदर्भात शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनेल, असे भाकीतही त्यांनी केलं होतं. त्यामुळे, विदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, आजच्या माजी आमदार रमेश कुथे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद विदर्भात वाढली आहे.