रागाने बघितल्याचा राग? तीन हल्लेखोरांकडून धारधार शस्त्राने वार करून २६ वर्षीय तरुणाचा खून

0
142

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर 

केवळ एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत २६ वर्षीय अक्षय दिपक चव्हाण याचा निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ७ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना कुरुंदवाड शहरातील माळ भागातील एका हॉटेलसमोर घडली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मध्यरात्री थरकाप उडवणारी घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत माळ भागातील हॉटेलजवळ उभा असताना, तीन अज्ञात तरुण तिथे आले. दोघांमध्ये काही क्षण वादविवाद झाला. फक्त रागाने बघितल्याचा मुद्दा हाणामारीत रूपांतरित झाला आणि त्यानंतर तिघांनी मिळून धारधार शस्त्रांनी अक्षयवर जबर हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

उपचाराअंती मृत्यू

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. अक्षयला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेनंतर माळ भाग परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळेस अशी हिंसक घटना घडल्याने स्थानिक सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

काय आहे हत्येचं नेमकं कारण?

सध्या खुनामागचं खरे कारण उघडकीस आलेलं नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि मोबाईल लोकेशनद्वारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्वीच्या वादातून उद्भवलेली असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here