
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
महिला व बालविकास विभागामार्फत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळीत सरकारकडून खास भेट मिळणार आहे. भाऊबीजच्या दिवशी त्यांना प्रत्येकी २,००० रुपयांची आर्थिक भेट देण्यात येणार असून, या निर्णयामुळे राज्यातील हजारो सेविका व मदतनीसांचा सण अधिक आनंददायी होणार आहे. यासाठी शासनाने तब्बल ४०.६१ कोटी रुपये निधी मंजूर करून त्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील महिलांच्या आरोग्य व बालकांच्या पोषणासाठी ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ (ICDS) राबवली जाते. या योजनेतून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रामीण तसेच शहरी भागातील समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून सेवा बजावत आहेत. बालकांच्या संगोपनात, मातांच्या पोषणात, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासात या सेविकांचे योगदान अमूल्य आहे.
या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे म्हणाल्या, “अंगणवाडी सेविका व मदतनीस या आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ आहेत. त्यांच्या अथक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात त्यांच्यात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, यासाठीच शासनाने भाऊबीज भेट स्वरूपात २ हजार रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. त्यांचा सण अधिक गोड व्हावा हीच आमची भूमिका आहे.”
या निर्णयानुसार, लवकरच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या मार्फत ही भाऊबीज भेट सर्व सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर थेट खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्यातील जवळपास २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस दिवसरात्र कार्यरत असून, ग्रामीण भागातील पोषण व आरोग्य संवर्धनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. शासनाकडून मिळणारी ही भाऊबीज भेट त्यांच्या कामाची दखल घेणारी ठरणार असून, दिवाळीसारख्या मोठ्या सणात त्यांचा आनंद द्विगुणित होईल.
या निर्णयामुळे केवळ सेविकांना आर्थिक आधार मिळणार नसून, त्यांच्या कार्याबद्दल शासनाने दाखवलेला सन्मान देखील त्यांना अभिमानाची जाणीव करून देणार आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या घरी या दिवाळीत गोडवा अधिकच वाढणार आहे.


