
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील राजकारण सध्या धगधगत असून, पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत. महाविकास आघाडी असो वा महायुतीचे घटक पक्ष, सगळ्यांनीच तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं भाकीत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सप्टेंबरमध्ये शिंदेंचा “भाव” वाढणार
अंजली दमानिया म्हणाल्या, “सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होणार आहेत. त्याचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल. सध्याच्या परिस्थितीवरून पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाव सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
फडणवीसांवर समन्वयाची जबाबदारी?
दमानिया पुढे म्हणाल्या की, सध्या केंद्रात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चाचपणी सुरू आहे. मात्र, एनडीएच्या काही घटक पक्षांचा पाठिंबा मिळण्यात अडचणी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी मिळाल्याचं दिसतं, असं त्या म्हणाल्या.
ठाकरे बंधूंची युती, पण निकाल शून्य
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी प्रथमच एकत्र लढत दिली. मात्र या युतीला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. याच पार्श्वभूमीवर दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे खोचक टोलाही लगावला.
“राज ठाकरे भाजपसोबत” – दमानियांचा दावा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर भाष्य करताना दमानिया म्हणाल्या, “बेस्ट निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ठाकरे बंधूंना शून्य जागा मिळाल्या. त्यामुळेच राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेले असावेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्य दिसत नाही, म्हणूनच त्यांनी भाजपसोबत समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:चा भाव वाढवण्यासाठी ते काही विधाने करतात, पण त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची अजिबात इच्छा नाही. उलट एक दिवस तेच उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील,” असा जोरदार दावा दमानियांनी केला.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दमानियांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने रंग घेत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत हालचालींवर आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत. विशेषतः सप्टेंबर महिन्यात शिंदे यांचा “भाव वाढेल” या विधानामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा कलाटणीबिंदू दिसेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.