महाराष्ट्रातील राजकारणातील स्तर खालवत चालला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सर्व नियम आणि संकेत सोडून हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. ‘एक तर तू राहशील नाहीतर मी’, असे सरळ आव्हान मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकीत दिले होते. त्यानंतर आता शिवसेना उबाठामधील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा वापर करुन बॅनरबाजी सुरु केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी डिवचले जात आहे. कल्याण पश्चिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
काय आहे बॅनरवर
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले त्यांनी केले. एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन, अशी टोकाची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर कल्याणमध्ये बॅनरबाजी सुरु झाली आहे. आता तू नाहीतर मी उद्धव साहेबांचा दणका…एक तर तू राहशील नाहीतर मी अशा आशयाचे लागले बॅनर लागले आहे.
बॅनरवर उद्धव ठाकरे वाघ बनून डरकाळी फोडत असल्याचे व्यंगचित्र देखील काढण्यात आले. कल्याणमधील खडकपाडा चौक, दूध नाका, बैल बाजार, पार नाका परिसरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भाजप, शिंदे सेनकडून प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका भारतीय जनता पक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देखील दिले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे एकटे नाहीत. त्यांच्या सोबत संपूर्ण पक्ष आणि संघ परिवार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची भाषा करू नये, असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला. फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिले होते. राजकारणात कोणी कोणाला राजकारणात संपवण्याची भाषा करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी जे केले आहे त्यामुळे सारा महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.