
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येरे येरे पैसा ३’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे खुद्द बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन. बिग बींनी स्वतः आपल्या ट्विटर (एक्स) हँडलवरून या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या “All Good Wishes” या पोस्टने मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या हस्ते ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. ट्रेलरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हास्य, अॅक्शन आणि थरार यांचा धमाल मेळ असलेला ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवतो आहे.
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स, आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट या बॅनरखाली ‘येरे येरे पैसा ३’ ची निर्मिती झाली आहे. निर्माते सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार माने, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, गिरीधर धुमाळ असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.
सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी केलं असून कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकप्रिय चेहऱ्यांचा समावेश आहे.
‘येरे येरे पैसा ३’ हा धमाल, डोकं बाजूला ठेवून पाहावा असा मनोरंजन प्रधान सिनेमा येत्या १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराने शुभेच्छा दिल्यानंतर या सिनेमाकडून आता अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.