
माणदेश एक्सप्रेस न्युज | नवी दिल्ली :
भारत-अमेरिका व्यापार तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले, औषध उद्योगाला धक्का दिला, शिवाय H1-B व्हिसाच्या शुल्कात झालेली तब्बल वाढ भारतीय IT व्यावसायिकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा दिलेला संदेश तंत्रज्ञान क्षेत्रातही प्रतिबिंबित होताना दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, देशात अमेरिकन ॲप्सवर बहिष्कार घालण्याचा विचार जोर धरू शकतो. त्यामुळे लोकांचा कल स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे झुकताना दिसत आहे. कोणते ॲप्स अमेरिकन ॲप्सला धोबीपछाड देऊ शकतात, त्याचा आढावा –
१. WhatsApp : Arattai
Zoho Corporation ने तयार केलेले Arattai हे WhatsApp सारख्याच सुविधा देणारे ॲप आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ग्रुप चॅट, व्हॉईस व व्हिडिओ कॉल यांसारख्या सोयी यामध्ये उपलब्ध आहेत. हे ॲप ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे उत्तम उदाहरण ठरते.
२. Google Maps : Mappls
MapmyIndia कंपनीचे Mappls हे Google Maps साठी थेट पर्याय आहे. हे ग्रामीण व शहरी भागातील अचूक नकाशे, रिअल-टाईम ट्रॅफिक, नेव्हिगेशन आणि ठिकाणांची माहिती देते. भारतीय भूगोलाची सखोल माहिती असल्यामुळे Mappls लोकप्रिय ठरत आहे.
३. Microsoft Word / Google Docs : Zoho Writer
क्लाऊड-आधारित Zoho Writer हे दमदार वर्ड प्रोसेसिंग टूल आहे. Microsoft Word ला तोड देणारे हे प्लॅटफॉर्म एडिटिंग, फॉर्मेटिंग, सहकार्यासाठी ऑनलाइन शेअरिंग अशा सुविधा पुरवते.
४. Microsoft Excel : Zoho Sheet
Zoho Sheet हे Excel साठी भारतीय पर्याय आहे. डेटा विश्लेषण, चार्टिंग टूल्स आणि रिअल-टाईम सहयोग या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. व्यवसायिक तसेच वैयक्तिक वापरासाठी हे ॲप सोयीचे ठरत आहे.
५. Microsoft PowerPoint : Zoho Show
प्रेझेंटेशनसाठी Zoho Show हा भारतीय पर्याय आहे. आकर्षक स्लाईड्स, टेम्प्लेट्स आणि व्हिज्युअल फीचर्स यामुळे याचा वापर वाढतोय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सार्वजनिक कार्यक्रमात Zoho Show वापरल्याने या ॲपला विशेष प्रसिद्धी मिळाली.
६. Gmail : Zoho Mail
ईमेल क्षेत्रात Zoho Mail हे Gmail ला भारतीय पर्याय आहे. यात सुलभ इंटरफेस, ईमेल व्यवस्थापन तसेच इतर Zoho प्रोडक्टिव्हिटी टूल्ससोबत इंटिग्रेशनची सुविधा आहे.
७. Adobe Sign : Zoho Sign
डिजिटल सिग्नेचर आणि डॉक्युमेंट ऑथेंटिकेशनसाठी Zoho Sign हे Adobe Sign चा पर्याय आहे. यामुळे सुरक्षितपणे पडताळणी व करार प्रक्रिया पूर्ण करता येते.
८. Amazon : Flipkart
ई-कॉमर्स क्षेत्रात Flipkart हे Amazon साठी सक्षम पर्याय आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते दैनंदिन वस्तूंपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे. ग्राहकांचा वाढता कल Flipkartकडे वळताना दिसतो.
भारत आणि अमेरिकेतील वाढता व्यापार तणाव, व्हिसा शुल्क वाढ आणि टॅरिफ यामुळे भारतीय नागरिकांमध्ये स्वदेशी ॲप्स आणि प्लॅटफॉर्म वापरण्याची भावना वाढताना दिसत आहे. Zoho, MapmyIndia आणि Flipkart सारख्या कंपन्या या लाटेवर स्वार होऊन अमेरिकन दिग्गजांना आव्हान देऊ शकतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हा ट्रेंड कायम राहिला तर लवकरच भारतात डिजिटल आत्मनिर्भरता साध्य होऊन जागतिक तंत्रज्ञान बाजारात देशाचा दबदबा वाढू शकतो.